बीजिंग: एका दशकापूर्वी जागतिक बाजारात आलेल्या मंदीचा फायदा घेऊन आर्थिक क्षेत्रात जोरदार मुसंडी मारणारा चीन आता मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. चीनमधील अनेक उद्योग सध्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळेच आर्थिक धोके टाळण्याला चीनकडून प्राधान्य दिलं जातं आहे. जिंग रोंग जिई (फायनान्शिल वर्ल्ड) संकेतस्थळावर चीनच्या आर्थिक संकटांबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाल्याचं वृत्त 'चायनास्कोप डॉट ऑर्ग'नं (chinascope.org) दिलं आहे. चीन त्यांच्या जीडीपीच्या 15 ते 17 टक्के इतका प्रचंड पैसा दरवर्षी व्याज चुकतं करण्यासाठी वापरतो. 'नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या चायनिज मुलान (महिला) उद्योजक वार्षिक संमेलनात कर्जावरील व्याजाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याशिवाय आर्थिक धोके टाळण्याला प्रथम प्राधान्य देण्याबद्दलही चर्चा झाली,' असे माओ झेन्हुआ यांनी जिंग रोंग जिई 'फायनान्शिल वर्ल्ड'सोबत बोलताना सांगितलं. माओ झेन्हुआ चायना चेंगशिन क्रेडिट मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.'2008 मध्ये जग आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलं होतं. या परिस्थितीचा अचूक फायदा उठवत चीननं आर्थिक क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी आघाडी घेतली. त्यामुळेच जागतिक स्तरावर सर्वाधिक चलन छापण्याचे अधिकारदेखील चीनला मिळाले,' असेही माओ यांनी सांगितले. मात्र आता चीनमधील अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडल्याचं वृत्त जिंग रोंग जिई (फायनान्शिल वर्ल्ड) आणि 'चायनास्कोप डॉट ऑर्ग'नं दिलं आहे. 'चीनमधील उत्पादनात मोठी वाढ झाली. मात्र उत्पादनाला तितकी मागणी नसल्यानं कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत,' असे जिंग रोंग जिई त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
चिनी ड्रॅगन मोठ्या आर्थिक संकटात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 10:23 AM