China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गुरुवारी कोरोनाच्या भीतीदायक आकडेवारीनंतर प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेकडो विमान उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहे. चीनमधील कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी प्रशासनानं पर्यटकांना जबाबदार धरलं आहे.
चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं कठोरपणे पालन केलं जात होतं. याच पार्श्भूमीवर देशाच्या सीमांवर कठोरपणे नियम आणि लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली होती. इतकंच काय तर इतर देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये सूट दिली जात असताना चीननं मात्र कठोर भूमिका घेतली होती.
सलग ५ व्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये वाढचीनमध्ये स्थानिक पातळीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. पण सलग पाचव्या दिवशी रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात आल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बहुतांश रुग्ण उत्तर आणि उत्तर-पश्चिम प्रांतातून समोर येत आहेत. प्रशासनाकडून या ठिकाणी आता कठोर नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. पाच प्रांतांमध्ये कोरोना रुग्ण आढळले असून यात राजधानी बीजिंगचा देखील समावेश आहे.
लोकांना घरातच राहण्याचं आवाहनस्थानिक पातळीवर सरकारनं मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. तसंच पर्यटन स्थळं बंद केली आहे. याशिवाय प्रभावित ठिकाणांमधील शाळा आणि सर्व मनोरंजन ठिकाणं देखील बंद करण्यात आली आहे. हाऊसिंग कंपाऊंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर जसं की लांझूहो येथे नागरिकांना घराबाहेर पडण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
लांझूहोची लोकसंख्या जवळपास ४० लाख इतकी आहे. ज्यांना घराबाहेर पडणं अत्यावश्यक आहे त्यांना कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रभावित ठिकाणी विमानतळावरुन शेकडो विमान उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. सियान आणि लांझूहो येथून उड्डाण घेणाऱ्या जवळपास ६० टक्के विमान उड्डाणं रद्द केली गेली आहेत.