चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या झिगोंगमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. चीनच्या सरकारी मीडियानुसार, सिचुआन प्रांतातील झिगोंग शहरात एका १४ मजली इमारतीला आग लागली. त्यामुळे अनेक जण इमारतीत अडकले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये इमारतीतून धूर निघताना दिसत आहे.
सरकारी मीडिया सीसीटीव्हीनुसार, आगीची माहिती मिळताच ३०० इमर्जन्सी वर्कर्स आणि डझनभर अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आलं. इमर्जन्सी वर्कर्सने बचाव कार्य केलं आणि इमारतीच्या आगीतून ३० जणांना वाचवलं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असं सांगण्यात आलं आहे की, कन्स्ट्रक्शन हे आग लागण्यामागचं कारण आहे. त्यामुळे ठिणगी पडली आणि नंतर आग लागली. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात रेस्क्यू वर्कर्स आणि प्रांतीय अधिकाऱ्यांना आगीचं कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितलं. तसेच या घटनेतून धडा घ्या, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. चीनमध्ये अशा घटना अगदी सामान्य झाल्या आहेत. यापूर्वी इमारतींना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इमारती बांधताना नियमांचं पालन न करणं हे आगीचे प्रमुख कारण आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये इमारतीतून आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. धूरही बाहेर पडत आहे, जो लांबून दिसत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी फक्त पाईपची मदत घेतली नाही, तर ड्रोनच्या माध्यमातून आग विझवण्याचं कामही करण्यात आलं. शहरातील ज्या मॉलमध्ये आग लागली त्या मॉलमध्ये डिपार्टमेंट स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि थिएटर्स तसेच अनेक कंपन्यांची कार्यालयं होती.