बीजिंग/तैपेई : चीन व तैवानमधील वाद वाढतच चालला आहे. अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पॅलोसी तैवानहून परतताच चीन आक्रमक झाला असून, त्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानच्या आजूबाजूला सहा ठिकाणी जोरदार लष्करी सराव सुरू केला आहे. चीनने तैवानच्या दिशेने काही क्षेपणास्रे डागली. चीनने डागलेली क्षेपणास्रे पहिल्यांदाच जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळली आहेत, असे जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी गुरुवारी सांगितले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य तटाजवळ अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीनने या लष्करी सरावाचे लाईव्ह फायरिंग, असे नामकरण केले आहे. तैवानच्या किनाऱ्यापासून केवळ १६ किमी अंतरावर हा सराव करण्यात येत असल्याचे वृत्त चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. या सरावात अस्सल शस्त्रे व दारूगोळ्याचा वापर करण्यात येत असून, हा सराव ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. चीन पूर्वी हा सराव तैवानपासून १०० किमीवर करत होता. मात्र, नॅन्सी यांच्या दौऱ्यानंतर तो आता खूपच जवळ सराव करत आहे.
आम्हाला युद्ध नकोय : तैवानतैवाननेही अंतर्गत संरक्षणासाठी सराव सुरू केला आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव नको आहे. देश वाद निर्माण होईल, अशा कोणत्याही स्थितीच्या विरोधात आहे. आम्हाला युद्ध नकोय पण, आम्ही युद्धासाठी सज्ज राहू, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
तैवानच्या आग्नेयेला अमेरिकी नौकाफिलिपीन्स सागरात अमेरिकी नौदलाची युद्धनौका दिसून आली. जेथे ही युद्धनौका दिसली, तो तैवानचा आग्नेय परिसर आहे. अमेरिकेची युद्धनौका युएसएस रोनाल्ड रिगन तेथे नियमित गस्त घालत असल्याचे अमेरिकी नौदलाने म्हटले आहे.
जागतिक पुरवठ्यावर परिणामचीन तैवानजवळील समुद्रात लष्करी सराव करत आहे. जगभरातील जवळपास निम्मी मालवाहू जहाजे याच मार्गावरून जातात. सेमी कंडक्टर व अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जगभर पाठवली जातात. नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठीही हा सागरी मार्ग महत्त्वपूर्ण आहे. चीन या लष्करी सरावामुळे सागरी वाहतूक बाधित होण्याची शक्यता आहे.
पेलोसींनी चीन-तैवान संबंधांवर वक्तव्य टाळलेसेऊल : तैवानचा दौरा करून चीनचा पारा चढविल्यानंतर अमेरिकी संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी गुरुवारी येथे द. कोरियात राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. तथापि, त्यांनी चीन-तैवान संबंधांवर जाहीर वक्तव्य करणे टाळले.