बीजिंग: दोन वर्षांपूर्वी चीनमधून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. या कोरोनाने जगभरात धूमाकुळ घातला. त्यानंतर आता चीनमध्ये माणसांमध्ये अजून एका व्हायरसची पुष्टी झाली आहे. बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनने मानवाला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण चीनमधून समोर आले आहे. चीनच्या आरोग्य प्रशासनाने मंगळवारी ही माहिती दिली. चांगली गोष्ट म्हणजे, याचा इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका कमी आहे.
5 एप्रिल रोजी मध्य हेनान प्रांतात चार वर्षांच्या मुलाला ताप आणि इतर लक्षणे आढळून आली. परंतु कुटुंबातील कोणालाही संसर्ग झाला नाही. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, हा मुलगा पाळीव कोंबडी आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता. NHC ने म्हटले आहे की, घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये यापूर्वीच H3N8 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. परंतु मानवाला H3N8 ची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आणि उप-प्रकार आहेत. यातील अनेक उप-रूपांमध्ये प्राण्यांना तसेच मानवांना संसर्ग झाला आहे. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
बर्ड फ्लू म्हणजे काय?हा एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू आहे. हा विषाणूजन्य संसर्ग पसरवून पक्ष्यांना संक्रमित करतो. दुसर्या भाषेत, हा रोग इन्फ्लूएंझा प्रकार ए विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. हा पक्षी आणि मानव, दोघांनाही आपल्या कवेत घेऊ शकतो. विशेष म्हणजे, एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1) बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांसह मानवांचाही मृत्यू होऊ शकतो.
बर्ड फ्लू माणसांमध्ये कसा पसरू शकतो?जेव्हा व्यक्ती संक्रमित कोंबडी किंवा इतर पक्ष्यांच्या जास्त संपर्कात असतो, तेव्हा ही समस्या उद्भवू शकते. जेव्हा व्यक्ती बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचे मांस (कच्चे मांस) खातो, तेव्हाही ही समस्या उद्भवू शकते. कोंबडी किंवा पक्षी जिवंत असो वा मेला, हा विषाणू डोळे, नाक किंवा तोंडातून माणसांमध्येही पसरू शकतो.