नवी दिल्ली : चीन गेल्या काही काळापासून देशात येणाऱ्या पर्यटकांवर नजर ठेवून आहे. यासाठी चीन त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने एक अँड्रॉईड मालवेअर टाकत आहे. या मालवेअरच्या मदतीने चीन त्या पर्यटकाचे मॅसेजसह अन्य फाईलचा ताबा मिळवू शकतो. चीनचे पर्यटकांशी जबरदस्तीने वागण्याची दखल जगभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.
यामध्ये म्हटले आहे की, चीनच्या Xinjiang भागात येणाऱ्या पर्यटकांना एक मालवेअर अॅप इन्स्टॉल करायला सांगितले जात आहे. एवढेच नाही शिनजियांगहून परतताना तेथील सुरक्षा अधिकारी पर्यटकांच्या मोबाईमधून हा व्हायरस काढून टाकत आहेत. नुकताच The Guardian ला हा मालवेअर इन्स्टॉल असलेला मोबाईल मिळाला. यानंतर न्यू यॉर्क टाईम्ससह अन्य वृत्तपत्रांनी याची पडताळणी केली असता सत्य बाहेर आले आहे.
सेलहंटर नावाचा हा मालवेअर खासगी माहितीच्या चोरीसह डिव्हाईसमध्ये असलेल्या अन्य फाईल्सही स्कॅन करतो. यामध्ये ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, मॅसेज, फोन लॉग, कॅलेंडर यासह अन्य माहिती चोरली जात आहे. याशिवाय हा मालवेअर चीनी एजन्सीना पर्यटकांच्या फोनचे लोकेशनही पाठवत आहे.
माहिती गोळा करण्याबरोबरच हे अॅप मोबाईलमधील जवऴपास 70 हजारहून अधिक फाईल्स स्कॅन करते, ज्या चीनच्या दृष्टीने संशयित आहेत. यामध्ये mp3 फाईल्ससह पिक्चर आणि दहशतवादी संघटनांचे फोटो किंवा व्हिडिओ सहभागी आहेत. चीन ही माहिती बॉर्डर ऑफिसच्या स्थानिक इंट्रानेटद्वारे सर्व्हरला साठवून ठेवत आहे. मात्र, याबाबत काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.