India Agni 5 Missile Test , China: भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने चीनच्या पोटात जळजळ झाल्याचे दिसत आहे. चीन मान्य करत नसला तरी हे भारताचे मोठे यश असल्याचे त्यांनाही माहिती आहे. म्हणून चीनकडून या परीक्षणानंतर प्रतिक्रिया आली आहे. कोणत्याही देशाला किंवा त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांना आपण घाबरत नसल्याचेही चीनकडून आपणहून सांगण्यात आले आहे. चीनच्या चिडचिडीचा अंदाज त्याच्या अलीकडच्या विधानावरून लावता येतो, ज्यात अरुणाचल प्रदेशाबाबतही त्यांनी बेताल वक्तव्ये केली होती.
भारताने सोमवारी अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) असलेल्या आघाडीच्या देशांच्या यादीत आपला समावेश केला. हे क्षेपणास्त्र मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. देशाच्या या यशाचे वर्णन पाश्चिमात्य माध्यमांनी चीन आणि पाकिस्तानला इशारा म्हणून केले आहे. चीनला ही गोष्ट पचनी पडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात जळजळ सुरु झाली आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, ज्याची मारक श्रेणी 5 हजार किमी आहे. चिनी तज्ज्ञांनी याला आक्रमक म्हटले आहे. त्यात असेही लिहिले आहे की, अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताने लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात एक नवीन यश मिळवल्याचे सूचित करते. सिंघुआ विद्यापीठातील नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटमधील संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले की, पाश्चात्य मीडिया चीनला भारताचा काल्पनिक शत्रू मानतो. त्यामुळेच भारताचे उद्दिष्ट चीनवर क्षेपणास्त्र कव्हरेज असल्याचे सांगितले जात आहे.
आम्ही कुणालाच घाबरत नाही
चीन देशाच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी सामरिक शस्त्रास्त्रांसह लष्करी तंत्रज्ञान विकसित करतो या भूमिकेवर चीन कायम ठाम असल्याचे चिनी तज्ञांचे म्हणणे आहे. भारत किंवा इतर कोणत्याही देशासोबत शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी होण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. अर्थातच आम्ही शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी नाही, परंतु आम्ही कोणत्याही देशाच्या शस्त्रास्त्रांना किंवा त्यांच्या तथाकथित लष्करी दबावाला घाबरत नाही, असे चीनकडून सांगण्यात आले आहे.