INDIA-Maldives Clashes: भारत आणि मालदीवमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मालदीवमधील मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या टीकेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बायकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला असून, चलो लक्षद्वीप ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, यामुळे आता चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावर आहेत. भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवचे समर्थन केले आहे. तसेच भारताबाबत तिरकस विधान केले आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि मालदीवच्या तणावग्रस्त संबंधांवर भाष्य केले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा चीन समर्थक म्हणून उल्लेख करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवले आणि याचे खापर चीनवर फोडू नये, अशी टीका करण्यात आली आहे.
दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही
चीन हा भारत आणि मालदीवसोबत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने, उदार होऊन विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे उपसंचालक लिन मिनवांग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन आणि भारताची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही गरज नाही. किंबहुना ते आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानून भारत त्याच्यावर दबाव आणू इच्छितो, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लॉंग जिंगचुन यांनी म्हटले आहे की, चीन हा मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. त्याच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारताप्रमाणे चीन इतर देशांच्या मालदीवशी असलेल्या संबंधांना विरोध करत नाही. ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने सांगितले की, मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही, असे म्हटले आहे.