लंडन/मेलबॉर्न : कोविड-१९ च्या साथीच्या पाच वर्षांपूर्वी चीनच्या लष्करी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा हत्यार म्हणून वापर करण्यासाठी विचार केला होता, तसेच तिसरे महायुद्ध जैविक शस्त्राने लढण्याचे भाकीत केले होते, असा दावा अमेरिकेच्या विदेश विभागाने प्राप्त दस्तावेजांच्या हवाल्याने केला आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने हे खळबळजनक दस्तावेज प्रथमत: जारी केले होते. ब्रिटनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने या ‘द ऑस्ट्रेलियन’च्या वृत्ताच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हे दस्तावेज अमेरिकेच्या विदेश विभागाने मिळविले आहेत. या दस्तावेजानुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकाऱ्यांनी हे भयावह भाकीत केले होते.चिनी लष्कराचे शास्त्रज्ञ आणि चिनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये हे दस्तावेज लिहिले होते. हे दस्तावेज अमेरिकेच्या विदेश विभागाच्या हाती लागले आहेत. कोविड-१९ चा उगम शोधण्यासाठी चौकशीचा भाग म्हणून चीनने हे दस्तावेज लिहिले होते.सार्स कोरोना विषाणूचेे कोविड हे एक उदाहरण असल्याचे चिनी शास्त्रज्ञांनी म्हटले होते, तसेच याचा जैविक शस्त्राचे नवयुग असल्याचा या दस्तावेजात उल्लेख केला होता.तथापि, चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राने ‘द ऑस्ट्रेलियन’ने हे वृत्त चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा वृत्तांत प्रकाशित केल्यावरून ‘द ऑस्ट्रेलियन’वर टीका केली आहे. कोरोनाचा संसर्ग जगभर पसरलेला असताना सुरुवातीपासून संशयाची सुई चीनकडे आहे.
सार्ससुद्धा जैविक हत्यार ?या दस्तावेजात असेही म्हटले आहे की, २००३ मधील सार्स एक मानवनिर्मित जैविक हत्यार असू शकते. ते अतिरेक्यांनी जाणीवपूर्वक पसरविले. संसदसदस्य टॉम टगेनधट आणि ऑस्ट्रेलियातील राजकीय पक्षाचे नेते जेम्स पेटरसन यांनी म्हटले आहे की, या दस्तावेजांनी चीनच्या पारदर्शकतेबाबत चिंता निर्माण केली आहे.