बीजिंग : अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघारीमुळे चीन सुखावला आहे. या भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे तालिबानी राजवटीचा आपल्या सार्वभौमत्वालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही चीनला आहे. त्यामुळे तालिबानला पाठिंबा देताना अतिशय सावध राहण्याची गरज चीनसाठी निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, भारत आणि इतर मित्र राष्ट्रांचे अस्तित्व असल्याने चीनला फार संधी नव्हती. मात्र, आता चीनसह पाकिस्ताननेही तालिबानला समर्थन दिले आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर तेल, नैसर्गिक वायू, तांबे व इतर खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात आहे. त्यावर चीनचा डोळा आहे. मात्र, त्यांचा फायदा घेण्यासाठी अफगाणिस्तानात राजकीय स्थैर्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. याची जाणीव चीनला आहे. तालिबानी दहशतवादाबाबत इतर देशांप्रमाणे चीनलादेखील चिंता आहे. त्यामुळेच इतर देशांविरोधात दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होऊ देऊ नका, असे चीनने तालिबानला वारंवार ठणकावून सांगितले आहे. चीनचा शिनजियांग प्रांत हा मुस्लिमबहुल आहे. या भागात तालिबान कारवाया करू शकतो, याचीही भीती चीनला आहे.
n तालिबानने पूर्वीप्रमाणे कारवाया सुरू केल्यास पाकिस्तानसह मध्य आशियामध्ये दहशतवाद वाढू शकतो. या भागात चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. चीनला याची किंमत मोजावी लागू शकते. म्हणूनच चीन सावध आहे.n चीन आणि तालिबानचे धार्मिक आणि वैचारिक प्रवाह वेगळे आहेत. चीनचाही तालिबानच्या धार्मिक कट्टरतावादाला विरोध आहे. मात्र, तरीही चीनने तालिबानी नेत्यांना संपर्क केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तालिबानचे राजकीय नेते मुल्ला अब्दुल बरादार यांची भेट घेतली होती. या बैठकीत यी यांनी चीनच्या अपेक्षांबाबत बरादार यांना स्पष्टपणे सांगितले होते.