बीजिंग- इराणवर अमेरिकेने नवी बंधने लादल्यानंतर मध्य-पूर्वेत नव्या आणि आशियात नव्या घडामोडी घडत आहेत. इराणचे अध्यक्ष हसन रुहानी पुढील महिन्यामध्ये चीनमध्ये जाणार असून रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांच्याबरोबर ते शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.अमेरिकेने सर्व देशांना इराणशी संबंध तोडण्यासाठी सांगितल्यावर कोणत्याही देशाने अमेरिकेच्या निर्णयाचा अजून उघड पुरस्कार केलेला नाही. त्याचप्रमाणे इराणबरोबरचा करार रद्द करण्याच्या बाजूने कोणीही उघड भूमिका घेतलेली नाही. याउलट 2015 साली चीन, रशिया, युरोपियन युनियनने इराणबरोबर केलेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, या देशांनी हा करार अमेरिकेने बहिष्कार घातला तरी कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवले आहेत.क्विंगदौ येथे 9 ते 10 जूनमध्ये शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि इराणचे हसन रुहानी यांची भेट होईल असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीनसुद्धा या शिखर परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. या भेटीबाबत माहिती देताना वांग यांनी या परिषदेत अणूकरारांसदर्भात चर्चा होईल की नाही हे स्पष्ट केले नाही. मात्र चीन हा इराणचा विविध प्रकल्पांमध्ये भागीदार असून इराणकडून कच्चे तेल विकत घेणारा सर्वात मोठा ग्राहक चीनच आहे. त्यामुळे चीन आगामी काळामध्येही इराणशी आपले संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल असे स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेने इराणशी करार रद्द केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी चीन, रशियासारखे देश तयारच आहेत.
इराणचे अध्यक्ष रुहानी चीनला जाणार; आंतरराष्ट्रीय तणावात नवी भर?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 1:48 PM