PM Modi India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. तशातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सीमावादाच्या दरम्यान भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. तसेच, या चर्चांचे योग्य व्यवस्थापन आणि देखभाल करण्याच्या उपयुक्ततेवरही भर दिला.
चीनची ही प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर आली आहे. भारतासोबतचे चीनचे संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मिळून सीमावादावर चर्चेतून तोडगा काढला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता दोन्ही देश राजकीय आणि लष्करी माध्यमातून चर्चा करत राहिले पाहिजेत, यावर चीनकडून भर देण्यात आला आहे. माओ निंग यांनी आशा व्यक्त केली की भारत आणि चीन परस्पर सहकार्य, संवाद आणि द्विपक्षीय संबंध मजबूतपणे पुढे नेण्यासाठी मतभेद दूर करण्यासाठी एकत्र काम करतील.
चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या
५ मे २०२० रोजी सुरू झालेल्या स्थितीमुळे दोन्ही बाजूंमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या आहेत. चिनी लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत गलवान व्हॅली, पँगॉन्ग लेक, हॉट स्प्रिंग्स आणि जियानान डबानमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. तथापि, चीनसोबतच्या संबंधांमध्ये सामान्यता आणण्यासाठी सीमा जैसे थे करणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत भारताने इतर भागातही चीनचे अधिकचे सैन्य मागे घेण्यावर दबाव आणला आहे.