ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 7 - अवकाश संशोधनात आपण पिछाडीवर पडू नये यासाठी चीनने आपल्या अवकाश संशोधन कार्यक्रमाला चांगलीच गती दिली आहे. चीन सध्या विमानातून थेट अवकाशात रॉकेट पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहे. सरकारी चीनी वर्तमानपत्राने अधिका-यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
लष्करी, व्यावसायिक आणि वैज्ञानिक उद्दिष्टयांसाठी शेकडो उपग्रह अवकाशात पाठवण्याची चीनची योजना आहे. चीनच्या लाँच व्हेईकल टेक्नोलॉजी प्रबोधिनीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये 100 किलो भार वाहून नेऊ शकणा-या रॉकेटचे डिझाईन तयार केल्याची माहिती ली टॉनग्यु यांनी दिली. Y-20 या चीनच्या वाहतूक विमानाने हे रॉकेट वाहून नेता येईल.
एका ठराविक उंचीवर हे रॉकेट विमानापासून वेगळे झाल्यानंतर प्रज्वलित होऊन अवकाशाच्या दिशेने प्रवास सुरु करेल असे ली यांनी सांगितले. विमानातून रॉकेट लाँचिंग हा जमिनीवरुन प्रक्षेपकाव्दारे उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या पारंपारिक पद्धतीला एक पर्याय आहे. यामुळे वेळापत्रक आणि अनुकूल वातावरणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
चीनची एप्रिल महिन्यात कार्गो स्पेसक्राफ्ट लाँच करण्याची योजना आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चीनच्या अवकाश कार्यक्रमाला प्राधान्य दिले आहे. चीनकडून प्रयत्न सुरु असले तरी, त्यांचा अवकाश कार्यक्रम अजूनही अमेरिका आणि रशियापेक्षा पिछाडीवर आहे.