चीन सातत्यानं तैवानवर नजर ठेवून आहे आणि अधून-मधून तैवानच्या समुद्री परिसरात चीनच्यायुद्धनौकांनी गस्त घालण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनचा तैवानबाबतचा एक कथित स्वरुपातील धक्कादायक प्लान उघड झाला आहे. यूट्यूबवर एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून याच चीनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं तैवानवरील हल्ल्याची रणनिती तयार केली जात असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी जपान दौऱ्यात चीनला याच मुद्द्यावरुन इशारा दिला आहे. चीननं जर तैवानवर हल्ल्याचा प्रयत्न केला तर अमेरिका जशास तसं उत्तर देईल असं बायडन यांनी म्हटलं आहे.
व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपनुसार चीनचे वरिष्ठ अधिकारी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत बोलत असल्याचं ऐकू येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत गुआंगडोंग पार्टीचे सेक्रेटरी, उप-सेक्रेटरी, गव्हर्नर आणि व्हाइस गव्हर्नर देखील सहभागी होते. यात ड्रोनपासून इतर सैन्य सामुग्रीच्या उत्पादनाबाबत कंपन्यांना दिल्या गेलेल्या ऑर्डरबाबत चर्चा केली जात असल्यांचं ऐकू येत आहे. या संभाषणात गुआगडोंग प्रांताला पूर्व आणि पश्चिम युद्धभूमीकडून काही टास्क देण्यात आलं असल्याचं ऐकू येत आहे.
मोठ्या तयारीचा संभाषणातून दावाऑडियो क्लिपनुसार १.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका, १६५३ मानवविरहीत सैन्य सामुग्री, २० एअरपोर्ट आणि बंदरं, ६ रिपेअरिंग आणि शीप निर्माण यार्ड, १४ आपत्कालीन ट्रान्सफर सेंटर यासोबतच रेशन, रुग्णालय, ब्लड बँक, ऑइल डेपो आणि गॅस स्टेशनसह इतर आवश्यक सामानाची पूर्वतयारी करण्याबाबतचं संभाषण सुरू असल्याचं ऐकू येत आहे. चीनचा हाच गुआंगडोंग प्रांत तैवानपासून सर्वात जवळ आहे. त्यामुळे या संभाषणातून तैवानवर हल्ल्याची तयारी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्यांदा समोर आला चीनचा प्लाननॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन रिक्रूटमेंट ऑफीसनं नव्या सैन्य भरती, निवृत्त अधिकाऱ्यांना एकत्र करण्याचं आणि स्पेशल श्रेणीमध्ये भरती करण्याचंही सांगण्यात आलं आहे. एकूण १५,५०० लोकांना एकत्र करण्याचं यात बोललं जात आहे. ही व्हायरल ऑडियो क्लीप चीनमध्ये राहणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर हेंग यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अपलोड केली आहे. ५७ मिनिटांच्या या क्लिपमध्ये यूट्यूब चॅनलवरही अपलोड करण्यात आलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे चीनच्या सैन्याशी निगडीत एकादा प्लान सर्वांसमोर आला आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा दावा यूट्यूब चॅनलनं केला आहे. चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांचा प्लान त्यांना जगासमोर आणायचा होता म्हणून त्यांनी असं केल्याचं सांगितलं जात आहे.