ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 21 - अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या 12 एजंट्सची चीनमध्ये हत्या करण्यात आली किंवा त्यांना कैद करण्यात आल्याचं वृत्त आहे. वर्ष 2010 आणि 2012 मध्ये या हत्या झाल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियात अमेरिकी हेरांची हत्या झाली होती. अमेरिकेतील दोन अधिकाऱ्यांनी ही गोपनीय माहिती रशियाला दिली होती. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुसरी घटना असल्याचे जाणकार सांगतात.
अमेरिकेतील जवळपास 10 अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 2010 ते 2012 या कालावधीत चीनने सीआयएच्या 18 ते 20 एजंट्सची हत्या केली किंवा त्यांना कैद. यातील एका एजंटची त्याच्या सहकाऱ्यासमोरच हत्या करण्यात आली होती. सीआयएला इशारा देण्यासाठी हे कृत्य करण्यात आले होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चीन सरकारने 2010 च्या अखेरपासून चीनमधील अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे जाळे निष्क्रीय केले असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अजूनही या घटनांचा तपास सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले. याबाबत द न्यूयॉर्क टाइम्सने सीआयएच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
सीआयएमधूनच काहीजण चीनला माहिती पुरवत असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे तर काहींनी सीआयए ज्या तंत्रज्ञानाद्वारे आपल्या गुप्तचरांसोबत चर्चा करते तेच तंत्रज्ञान चीनने हॅक केल्याची शक्यता वर्तवली आहे.