बीजिंग- चीन आणि नेपाळ यांच्यामधील जवळीक वाढली असून दोन्ही देशांनी 14 विविध करारांवर स्वाक्षरी केली आहे. चीनने आपले रेल्वेचे जाळे काठमांडूपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सध्या 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत.दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यावर ओली यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 19 जूनपासून सुरु झालेला हा दौरा पाच दिवस चालणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांच्यासह पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि 14 करारांवर स्वाक्षरी केली. काल दोन्ही देशांनी 2.4 अब्ज डॉलर्सच्या करारांना संमती दिली. यामध्ये जलविद्युत प्रकल्प, सिमेंट कारखाने, फळ उत्पादन यांचा समावेश आहे. तिबेट आणि नेपाळ यांना रेल्वेने जोडण्याबद्दलही काल चर्चा झाली. नेपाळची राधानी काठमांडू आणि तिबेटमधील शिगात्से हे शहर जोडण्यात येणार आहे.
चीनने रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे याआधीच तिबेटमध्ये तयार केले आहे. आता रस्ते आणि रेल्वेमार्ग नेपाळपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तिबेटमधील रेल्वेला अभियांत्रिकाचा उत्तम आविष्कार मानले जाते.
मधेसींच्या आंदोलनांनंतर 2016 साली ओली यांनी नेपाळची भारतावरील भिस्त कमी करून चीनशी जवळीक वाढवायला सुरुवात केली होती. नेपाळमध्ये चीनी रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे पसरले जावे यासाठी ते प्रयत्न करु लागले होते. आता तेच प्रयत्न प्रत्यक्षात येताना दिसतील.