बीजिंग: सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाचवेळी 15 बहुमजली इमारती बॉम्बब्लास्टने पाडल्याचं दिसतं आहे. चीनमधील युनान प्रांतात असलेल्या या इमारती स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आल्या. अवघ्या काही सेकंदात आकाशाला स्पर्श करणाऱ्या इमारती जमिनीदोस्त झाल्या.
स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात वापरस्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मागील अनेक वर्षांपासून इमारतींचे बांधकाम बंद होते, काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांना पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारती खाली पाडण्यासाठी 4.6 टन स्फोटकांचा वापर करण्यात आला. या स्फोटकांच्या मदतीने अवघ्या 45 सेकंदात या गगनचुंबी इमारती खाली आल्या. या इमारती पाडताना विशेष काळजी घेण्यात आली होती. इमारती पाडण्यापूर्वी जवळपासची सर्व दुकाने बंद करण्यात आली आणि लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.दरम्यान, पैशांचा अपव्यय म्हणत सरकारच्या या कृतीला नागरिकांकडून विरोधही होत आहे.
इमारती पाडताना 2000 कर्मचारी तैनात
या इमारती पाडताना खबरदारी म्हणून 2000 कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. या इमारती युनान प्रांताच्या कानमिंगमधील लियांग स्टार सिटी फेज 2 प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जात होत्या. पण, मागणीअभावी मागील आठ वर्षांपासून याचे काम थांबले होते. या प्रकल्पाची किंमत सुमारे 1 अब्ज चीनी युआन होती. या 15 गगनचुंबी इमारती कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे ढग पसरले.