बीजिंग - एकमेकांपेक्षा अधिकाधिक शक्तिशाली बनण्यासाठी सध्या अमेरिका आणि चीनमध्ये चढाओढ सुरू आहे. ही स्पर्धा आता पृथ्वीपासून अंतराळापर्यंत पोहोचली आहे. आता या स्पर्धेत अमेरिकेला धोबीपछाड देण्यासाठी चीनने थेट सूर्याच्या अंतर्भागात डोकावण्याची योजना आखली आहे. त्यासाठी चीनने जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप समूह तयार केला आहे. हे टेलिस्कोप ३.१४ किमीच्या एका गोलाकारात लावण्यात आले आहेत. हे टेलिस्कोप बनवण्यासाठी चीनने ३१३ डिशचा वापर केला आहे. त्या माध्यमातून चीन सूर्याच्या वर्तनात होणाऱ्या बदलांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे
जाणून घेता येणार आहे. त्याशिवाय ड्रँगन याच्या मदतीने संपूर्ण ब्रह्मांडावर लक्ष ठेवण्यास सक्षम होईल. हा टेलिस्कोप जून २०२३पासून कार्यरत होईल. चीनने या टेलिस्कोपचं नामकरण द दाओचेंग सोलर रेडिओ टेलिस्कोप असं ठेवण्यात आलं आहे. हा टेलिस्कोप चीनने दक्षिण पश्चिम प्रांतातील सिचुआनमध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये लावण्यात आलेल्या ३१३ डिशमधील सर्व डिशची रुंदी १९.७ फूट आहे. ज्यातून एक गोल तयार होतो. तो ३.१४ किमी पसरला आहे. या टेलिस्कोपचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो सौरवादळे आणि कोरोनल मास इजेक्शनवरही लक्ष ठेवू शकेल.
हा सोलर टेलिस्कोप बनवणाऱ्या टीममधील चीनी शास्रज्ञ वू लिन यांनी सांगितले की, एखादं सौरवादळ पृथ्वीवर येईल कि नाही हे आता आम्ही सांगू शकतो. जर एखादं सौर वादळ आलं आणि ते पृथ्वीपर्यंत पोहोचलं तर आपण अशा सौरवादळांबाबत आधीच अलर्ट जारी करू शकतो. अशाप्रकारे आता अंतराळातील हवामानाची भविष्यवाणी करता येईल.