बीजिंग : ‘एक मूल’ हे वादग्रस्त धोरण संपुष्टात आणणारा नवा कुटुंबनियोजन कायदा चीनमध्ये शुक्रवारपासून अमलात आला. त्यामुळे चिनी लोक आता बिनधास्तपणे ‘हम दो हमारे दो’ असे म्हणू शकतील. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनने वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्याकरिता एक मूल धोरण स्वीकारले होते. जगभरातून टीका होऊनही ‘ड्रॅगन’ने ते कठोरपणे राबविले. त्यामुळे लोकसंख्येच्या वाढीला आळा बसला. तथापि, वृद्धांची संख्या वाढली तर तरुणांची घटली. या असमतोलाचा परिणाम म्हणजे मनुष्यबळ घटू लागले. त्यामुळे अखेर चीनला ‘एक मूल’ हे धोरण संपुष्टात आणण्याचा निर्र्णय घ्यावा लागला. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने नव्या दोन मूल धोरणाची घोषणा गेल्या आॅक्टोबरमध्ये केली होती आणि संसदेने गेल्या महिन्यात नववर्षापासून ते अमलात आणण्यास मंजुरी दिली होती. या धोरणाचा लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)एक मूल धोरण १९७८ पासून अमलात आणण्यात आले होते. गेली तीन दशके अमलात असलेल्या या धोरणामुळे बहुतांश जोडप्यांना एकाच मुलावर समाधान मानावे लागले. एकाहून जास्त अपत्य जन्माला घालण्याचा प्रयत्न झाल्यास एकतर जबर दंड ठोठावला जाई किंवा मग संबंधित महिलेचा गर्भपात करण्यात येत असे. या धोरणाने तब्बल ४०० दशलक्ष बाळे जन्माला येण्यापासून रोखून देशाच्या लोकसंख्येत आणखी १.३५७ अब्ज लोकांची भर पडणे टाळले. देशात २०१३ मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यात एक मूल धोरणामुळे देशाच्या लोकसंख्यावाढीला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे समोर आले होते. या धोरणाचा नकारात्मक परिणाम म्हणजे वृद्धांची संख्या वाढली तर तरुणांची संख्या घटली. त्याचा परिणाम मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर झाला. ताज्या आकडेवारीनुसार, २०१४च्या अखेरीस चीनमधील ६० वर्ष आणि त्यावरील लोकांची संख्या २१२ दशलक्षांवर, तर वृद्धांचे प्रमाण १५.५ टक्क्यांवर गेले आहे.यात भर म्हणजे विकलांग ज्येष्ठांच्या संख्येने ४० दशलक्षाचा आकडा पार केला आहे.
चीनमध्ये आता ‘हम दो हमारे दो’
By admin | Published: January 02, 2016 8:35 AM