पेइचिंग : जागतिक पातळीवर श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले चीनमधील अब्जाधीश, अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी पाहिले न गेल्याने ते बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आता चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा यांचा ठावठिकाणा उघड केला आहे.
जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र 'पीपल्स डेली'ने जॅक मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या वृत्तपत्रानुसार, जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची ताकीद दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.
जॅक मा यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर सरकारची खप्पा मर्जी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'युके टेलिग्राफ'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जॅक मा यांच्याच कंपनीने आयोजित केलेल्या 'आफ्रिकाज बिझनेस हीरोज' या टॅलेंट शोच्या अंतिम भागात परीक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. तथापि, ते कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यांच्या जागी कंपनीचा एक कार्यकारी अधिकारी उपस्थित राहिला.
दरम्यान, जॅक मा यांनी ऑक्टोबरमध्ये चीनच्या वित्तीय नियामकावर टीका केली होती. जॅक मा यांनी नियामकाच्या नियमांना 'म्हाताऱ्यांचा क्लब' आणि चिनी बँकांना 'सावकारी दुकाने' म्हटले होते. या टीकेमुळे चिडलेल्या सरकारने जॅक मा यांच्या अँट समूहाचा एक आयपीओ रोखला. अलिबाबाविरुद्ध डिसेंबर २०२० मध्ये एकाधिकारशाहीविरोधी चौकशी सुरू करण्यात आली.