ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 30 - भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रातल्या भागिदारीच्या सामंजस्य करारावरून चीन आणि पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. इंडो-अमेरिका संरक्षण सामंजस्य करारावरून चीन आणि पाकिस्तान नाराज असल्याचं वृत्त चिनी मीडियानं दिलं आहे. विशेष म्हणजे या भागिदारीवरून रशिया हा देशही नाराज असल्याची चर्चा आहे.
मात्र या संरक्षण करारामुळे आशियात भारताची भौगोलिक आणि राजकीय स्तरावर सुरक्षितता वाढली आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच चीन आणि पाकिस्ताननं या करारावरून नाराजी व्यक्त केली आहे. या करारानुसार युद्धजन्य परिस्थितीत भारताचं सैन्य अमेरिकेला तर अमेरिकेच्या सैन्याला भारताला मदत करता येणार आहे. भारताच्या अमेरिकेसोबतच्या सामंजस्य करारामुळे चीनला धोका निर्माण होण्याची शक्यता चिनी मीडियानं व्यक्त केली आहे.
त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांनी एकत्रितपणे भारताविरोधात आघाडी उघडली आहे. विशेष म्हणजे या करारामुळे भारतानं जपान, चीन, रशिया या शक्तिशाली देशांचं स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं आहे. चीनवर दबाव आणण्यासाठीच अमेरिकेनं भारतासोबत हा सामंजस्य करार केल्याचा कांगावा चीननं केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काळात वाहतुकीसंदर्भात करार करण्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.