चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. सोशल मीडियावरील अनेक पोस्टनुसार, क्षी जिनपिंग यांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) प्रमुख पदावरून हटवण्यात आले असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तथापि, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी किंवा स्थानिक माध्यमांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
क्षी जिनपिंग नुकतेच उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. येथे त्यांनी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधला. यादरम्यान, २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर झालेल्या चकमकीनंतर ते प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समोरासमोर आले. शनिवारी अनेक ट्विटर युझर्सने जिनपिंग यांच्या कथित नजरकैदेबद्दल काही पोस्ट केल्या होत्या. हा लष्करी उठाव आहे आणि पीएलएची वाहने आधीच राजधानी बीजिंगकडे जात आहेत, असाही दावा काही जणांनी केला होता.
बीजिंगला जाणार्या लष्करी वाहनांचा हा व्हिडिओ देशाने ५९ टक्के उड्डाणे ग्राउंडींग केल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकार्यांना तुरुंगात पाठवल्यानंतर लगेचच समोर आला आहे. या ठिकाणी खूप गोंधळ आहे, याचा अर्थ सीपीपीमध्ये काहीतरी घडत आहे. चीन अस्थिर आहे," असे ट्वीट एका व्यक्तीने केले.