ऑनलाइन लोकमत
हेग, दि. 12 - चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावर चीनचा कुठलाही हक्क नसल्याचा निवाडा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला असून चीनसाठी हा चांगलाच धक्का मानण्यात येत आहे. दक्षिणेकडील समुद्र किंवा साउथ चायना सी ही आपलीच जहागीर असल्याचा चीनचा अविर्भाव होता आणि यावरून फिलिपाइन्ससह अनेक देशांशी चीनचे खटकेही उडत होते. मात्र, फिलिपाइन्सच्या बाजुने कौल देताना, हा समुद्री भाग चीनची मालकी नसल्याचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे.
या समुद्री विभागावर आपला ऐतिहासिक हक्क असल्याचा चीनचा दावा होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशांच्या विपरीत हा दावा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या क्षेत्रातल्या कुठल्याही बेटाने चीनला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून मान्यता दिलेली नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
झिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने वादग्रस्त साउथ चायना सीबाबत अत्यंत कलुषित असा निवाडा कायद्याची पायमल्ली करणाऱ्या न्यायालयाने दिला आहे, अशा शब्दांत या निर्णयाचे वर्णन केले आहे. या व्यतिरिक्त अन्य तपशील अद्याप समजलेला नाही.
(छायाचित्र - विकिपीडिया)