नवी दिल्ली - अलीकडेच भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक भागीदारी वाढल्याचा रिपोर्ट समोर आला होता. मात्र या रिपोर्टच्या आकडेवारीवर चीननं प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. अमेरिका नव्हे तर चीनचभारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचं चीननं दावा केला आहे. भारतासोबत व्यापार वाढवण्यासाठी सर्व उपाय करण्यासाठी तयारी आहे असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारतानं अन्य देशाच्या तुलनेत अमेरिकेसोबत सर्वाधिक व्यापार केल्याचं अर्थ मंत्रालयाच्या डेटामध्ये म्हटलं होतं. त्यावर चीननं उलटा दावा केला आहे.
चीन गेल्या अनेक वर्षापासून भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. परंतु नवीन आकडेवारीनुसार, आता अमेरिकेने चीनला मागे टाकल्याचं सांगण्यात आले. आर्थिक वर्ष २०२१-२२ या काळात अमेरिकेने चीनला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार बनला. २०२१-२२ या वर्षात अमेरिका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापार वाढून ११९.४२ अब्ज डॉलर इतका झाला. तर २०२०-२१ या काळात हा व्यापार ८०.५१ अब्ज डॉलर होता. परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या काळात भारत आणि त्यांच्यात १२५.६६ अब्ज डॉलर व्यापार झाला असून चीन भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक भागीदारीबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. अशाप्रकारे डेटा गोळा करण्याबाबत काही पद्धतीत अंतर असल्यानं हे कारण आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी जी आकडेवारी जारी केली. त्यात २०२१ मध्ये चीन आणि भारत यांच्या द्विपक्षीय १२५.६६ अब्ज डॉलर व्यापार झाला. या आधारावर चीन भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशात पहिल्यांदाच व्यापार १०० अब्ज डॉलरच्या वर पोहचला आहे. डेटा जमा करण्याच्या पद्धतीत अंतर असल्याने भारत आणि चीन यांच्या आकडेवारीत फरक असू शकेल असं चीननं म्हटलं आहे.
२०२१ मध्ये भारत चीन यांच्यात १२५.६६ अब्ज डॉलर व्यवसाय झाला. जो २०२० मधील व्यापाराच्या तुलनेत ४३.३ टक्क्यांनी अधिक होता. वर्ष २०२० मध्ये भारत-चीन यांच्यात ८७.६ अब्ज डॉलर व्यवसाय झाला. २०२१ मध्ये पूर्व लडाख येथे सीमेवर तणाव असताना दोन्ही देशातील व्यापार वाढला होता. परंतु हा व्यापार चीनच्या बाजूने होता. भारत-चीन यांच्यातील व्यापार कोविड महामारीमुळे वाढल्याची स्थिती होती. कोविड महामारीत भारताने चीनकडून अधिक प्रमाणात वैद्यकीय उपकरणं मागवली होती.