ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 02 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन अमेरिकेवर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला व्यापारात चीनकडून झालेल्या नुकसानाबाबत बोलताना हा आरोप केला आहे.
'आपण चीनला आपल्या देशावर सतत बलात्कार करण्याची परवानगी देऊ शकत नाही, सध्या ते हेच करत आहेत', असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर माझ्या पद्धतीने चीनला हाताळेन असंही ट्रम्प बोलले आहेत. इंडियाना पसिरात रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. अमेरिकेशी तुलना करता चीनचा निर्यात दर जास्त असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
'आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी चीन आपल्या चलनासोबत फेरफार करत आहे', असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 'चीन अमेरिकेच्या व्यापाराची हत्या करत असल्याचंही', ट्रम्प बोलले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारसभांदरम्यान प्रथमच बलात्कार या शब्दाचा वापर केला आहे. 'आपण चारी बाजूने पिछाडत आहोत, आपल्याला पिगी बँकेप्रमाणे लुटलं जात आहे. पण आपल्याकडे महत्वाचे पत्ते आहेत हे विसरु नये, आपल्याकडे चीनपेक्षा जास्त ताकद आहे', असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
'माझा राग चीनवर नसून आपल्या नेत्यांवर आहे. अमेरिकेतील नेत्यांनी आपलं सामर्थ्य हरवलं आहे', असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2011 मध्येदेखील चीन अमेरिकेवर बलात्कार करत असल्याचं वक्तव्य केलं होतं.