सॅटेलाईट इंटरनेटवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्यात एलन मस्कशिवाय चीनचीही नजर आहे. त्यामुळेच चीनकडून सातत्याने सॅटेलाईट नेटवर्कच्या दृष्टीने नवनवीन निर्णय घेतले जात आहेत. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे ज्यातून चीननं इंटरनेट मार्केटवर कब्जा करण्यासाठी रणनीती आखल्याचं बोललं जातंय.
सॅटेलाईट नेटवर्कसाठी चीन देशाबाहेरही पाय पसरू लागला आहे. CGNT न्यूज रिपोर्टनुसार, मागील काळात चीननं बँकॉकमध्येही याची चाचणी केली आहे. २०२५ पर्यंत इंटरनेट मार्केटवर पूर्णत: कब्जा मिळवण्याचं उद्दिष्ट चीननं डोळ्यासमोर ठेवले आहे. एलन मस्क आणि स्पेस एक्स याआधीच यावर काम करत आहेत. परंतु २०२५ पर्यंत चीनचं सॅटेलाईट नेटवर्क प्रोजेक्ट ४४.७ बिलियन यूआनपर्यंत पोहचेल. ही एक मोठी रणनीती असू शकते कारण जर असं झालं तर चीन सॅटेलाईट मार्केटमध्ये खूप पुढे जाईल.
चीनी स्मार्टफोन कंपन्यांकडून सॅटेलाईट कॉलिंग फिचरही मोबाईलमध्ये दिला जात आहे. त्यात Oppo, Honor आणि Huawei यांचा समावेश आहे. या कंपन्या पहिल्यापासून हे फिचर देत असून ते यूजर्ससाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. चीनमध्ये खूप शहरांमध्ये नेटवर्क समस्या आहे. त्याठिकाणी ग्राऊंड इंटरनेट करणं कठीण आहे. अशावेळी सॅटेलाईट नेटवर्क या शहरांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण त्या मदतीनं जगातील कुठल्याही कोपऱ्यात कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर केला जाऊ शकतो.
काय आहे सॅटेलाईट नेटवर्क?
सॅटेलाईट इंटरनेट हा इंटरनेट कनेक्शनचा एक प्रकार आहे ज्यामध्ये अवकाशातील उपग्रह जमिनीवर बेस स्टेशनची भूमिका बजावतात. प्रत्येक उपग्रह मोबाईल बेस स्टेशन म्हणून काम करू शकतो, जगभरातील युजर्सना सोयीस्कर इंटरनेट कनेक्शन देतो. केवळ उंच पर्वतांमध्येच नाही तर समुद्रात अन् हवेतही लोक आता सॅटेलाइट इंटरनेटवर वेब सर्फिंगचा आनंद लुटू शकतात. सॅटेलाईट नेटवर्कचा वापर हा प्रामुख्याने ट्रान्सोसेनिक टीव्ही प्रसारण आणि दूरध्वनी कॉलसाठी होता.