नवी दिल्ली : अणुप्रसारबंदी कराराचा (एनपीटी) हवाला देत आण्विक इंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या समावेशाला विरोध करणाऱ्या चीनने स्वत:च या कराराचे उल्लंघन केले आहे. २०१० मध्ये एनपीटी समीक्षा परिषदेत अणुतंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत संमत करण्यात आलेला ठराव मोडून चीनने पाकिस्तानला अणुभट्ट्या दिल्या आहेत. आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या (एसीए) ताज्या अहवालात चीनच्या या दुटप्पीपणाचा पर्दाफाश झाला. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने निश्चित केलेल्या मापदंडाच्या कसोटीवर उतरत नाही. त्यामुळे त्याला अणुभट्ट्या उपलब्ध करून देणे एनटीपीचे उल्लंघन असल्याचे एसीएने म्हटले आहे. करारवर स्वाक्षरी केलेले १८७ देश नागरी उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) मार्गदर्शनाखाली अणुऊर्जेची निर्मिती आणि वापर करू शकतात. चीनने २०१३ मध्ये चश्मा ३ अणुभट्टीसाठी पाकसोबत केलेला करार २०१०च्या एनपीटी समीक्षा परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या ठरावाचे उल्लंघन ठरतो, असे या अहवालात म्हटले आहे. समीक्षा परिषदेत संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार, ज्या देशाला आण्विक साहित्य आणि तंत्रज्ञान पुरवायचे आहे त्या देशाने आयएईने लागू केलेली सुरक्षा नियमावली आणि अण्वस्त्रे विकसित न करण्याचे बंधन पाळण्याचे मान्य करावे लागते. पाकने यापैकी एकही अट मान्य केलेली नाही. चीन एनपीटीचा हवाला देत भारताच्या एनएसजीतील प्रवेशास सातत्याने विरोध करीत आहे. एनएसजीतील आपल्या समावेशात चीनच प्रक्रियात्मक अडथळे निर्माण करीत असल्याचे भारताने ताडले आहे.तथापि, भविष्यात आपल्या भूमिकेचा तो फेरविचार करील, या आशेने भारताने या मुद्यावर चीनसोबत चर्चा सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>करार किती देशांचा?१९७० मध्ये एनपीटीच्या घोषणेनंतर आतापर्यंत अणुप्रसारबंदी करार १८७ देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, संबंधित देशांना अण्वस्त्रे विकसित करता येत नाहीत.
चीनने पाकला दिल्या अणुभट्ट्या
By admin | Published: August 02, 2016 4:47 AM