नवी दिल्ली - अमेरिकेच्या धर्तीवर चीनने भारताच्या सीमेजवळ तैनात केलेल्या सैन्यातील विशेष तुकडी टेक्निकल वॉरफेअरसाठीही सज्ज ठेवली आहे. भविष्यात कुठल्याही मोठया युद्धात टेक्नॉलॉजीची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. त्यादुष्टीने अमेरिकेने आपली विशेष पथके तयार केली आहेत. चीननेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तशा विशेष तुकडया बनवल्या आहेत. युद्ध काळात वेगवान हालचाली करताना तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा त्याचे प्रशिक्षण या तुकडयांमधील सैनिकांना देण्यात आले आहे.
इनफॉरमॅटाईजड वॉरफेअर हा शब्द मागच्या काहीवर्षात चिनी लष्कराकडून सातत्याने वापरला जात आहे. युद्ध प्रसंगात आयटी, डिजिटल आणि कृत्रिम गुप्तचर अॅप्लिकेशन्सचा वापर कसा करायचा त्याचे प्रशिक्षण या तुकडीतील सैनिकांना देण्यात आले आहे. स्काय वोल्फ कमांडोस ही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडची स्पेशल ऑपरेशन फोर्स आहे. भारताला लागून असलेल्या 3,488 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी वेस्टर्न थिएटर कमांडकडे आहे.
हे स्काय वोल्फ कमांडोस QTS-11 सिस्टिमने सज्ज आहेत. या तुकडीतील कमांडो असॉल्ट रायफल, 20 मिलीमीटर ग्रेनेड लाँचर, थर्मल इमेजर, ऑपटोइलेक्ट्रॉनिक्स आणि जीपीएसने सज्ज असतो. QTS-11 ने सज्ज असलेल्या कमांडोकडे 7 किलो वजन असते. डिजिटल सैनिक अशी ही मूळ कल्पना आहे. काही विकसित देश आता त्या दिशेने काम करत आहेत. अमेरिका आणि चीनकडे असलेली QTS-11 सिस्टिम सारखी असली तरी त्यांची तुलना होऊ शकत नाही. कारण तुम्ही त्या सिस्टिमचा कसा वापर करता त्यावर सर्वकाही अवलंबून असते. चीनमध्ये स्काय वोल्फ कमांडोस पहिल्यांदा या सिस्टिमचा वापर करत आहेत.