बिजींग - सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत. चीनमधील भारताचे राजदूत गौतम बांबावले यांनी ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सीपीईसी प्रकल्पावरुन ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा कढाला पाहिजे असे मत व्यक्त केले होते.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ च्युनयिंग यांनी सुद्धा यासंबंधी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मतभेदांमुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचू नये यासाठी चीन सीपीईसी प्रकल्पावरुन जे मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे असे हुआ च्युनयिंग यांनी सांगितले. कोणा एकाला आपण समस्या सोडवायला सांगू शकत नाही. या मुद्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी भारताबरोबर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे असे च्युनयिंग म्हणाल्या.
सीपीईसी हा आर्थिक सहकार्य प्रकल्प आहे. कुठल्या तिस-या पक्षाला लक्ष्य करण्याचा या प्रकल्पामागचा हेतू नाही असे त्या म्हणाल्या. सीपीईसी प्रकल्पातंर्गत पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे उभे राहणार आहे. चीनचा शिनजियांग प्रात आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर या प्रकल्पाने जोडले जाणार आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे दोन्ही देशातील जवळीक मोठया प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पातंर्गत चीनने पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक केली आहे.ॉ
चाबहारचे महत्त्व चीनच्या सीपीईसी प्रकल्पाला पर्याय म्हणून भारताने इराणच्या चाबहारमध्ये बंदर विकसित केले आहे. इराण, भारत आणि अफगाणिस्तान या तिघांनी मिळून चाबहार बंदर विकसित केले आहे. चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपूर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतापासून चाबहार पर्यंत रेल्वेमार्ग बांधण्यात येत आहे, तसेच काबूलपासून 130 किमी अंतरावरील हाजिगाक कोळसा क्षेत्रात कोळसा उत्खननाचे हक्कही भारताला मिळाले आहेत. चाबहार-मिलाक-झारांज-दिलाराम असा रस्ता भारत बांधत असल्यामुळे अफगाणिस्तानसोबतही भारताचा व्यापार वाढणार आहे. इराण-पाकिस्तान- भारत या वायूवाहिनी प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर भारत आणि इराण अरबी समुद्रातून वायू वाहिनी नेण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे पाकिस्तानला शह बसणार आहे.