ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 07 - मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने मान्य केलं आहे. महत्वाचं म्हणजे चीनने प्रथमच सार्वजनिकरित्या हे मान्य केलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 164 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 308 लोक जखमी झाले होते.
चीनमधील वृत्तवाहिनी सीसीटीव्ही9 वर (CCTV9) नुकतीच एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. या डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील त्यांच्या समर्थकांबद्दल सांगण्यात आलं होतं.
चीनने आपल्या धोरणात बदल केल्याच्या दृष्टीने याकडे पाहिलं जात आहे. नुकतच जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची मागणी भारताने केली होती. मात्र पाकिस्तानची नेहमी बाजू घेणा-या चीनने या मागणीला विरोध केला होता. ज्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवर टीका करण्यात आली होती.