बीजिंग, दि. 8 - नुकत्याच आटोपलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर भारताच्या दबावामुळे पाकिस्ताची कोंडी करण्यात आली होती. मात्र त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच चिनने दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच चीन आणि पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या अफगाणिस्तान धोरणावरही टीका केली आहे. चीनने पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढ्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप केल्यानंतर चीनने हे वक्तव्य केले आहे. चीनने परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले, "पाकिस्तानची जनता आणि सरकारने दहशतवादाशी लढण्यासाठी मोठा त्याग केला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हे समजून घेतले पाहिजे. दहशतवादाविरोधातील या लढ्याचे पूर्ण श्रेय पाकिस्तानला जाते." वांग यी आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे वक्तव्य समोर आले आहे. आसिफ सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, अमेरिका आणि पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा चीन दौरा झाला आहे. चीन आणि पाकिस्तानमधील या बैठकीत ट्रम्प यांच्या नव्या अफगाणिस्तान धोरणावरही जोरदार टीका करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी तालिबानसोबत नव्याने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून तेथे 16 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल. चीनमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत भारताने दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानची कोंडी केली होती. त्यामुळे दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आले होते, अतिरेकी कारवाया घडवून आणणारे, कट कारस्थान करणारे आणि सहकार्य करणाºयांना जबाबदार ठरविले पाहिजे, असा सूर या संमेलनातून उमटला. या दोन संघटनांसह अन्य अतिरेकी संघटनांवर कारवाईची मागणी ब्रिक्स देशांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी या अतिरेकी कारवायांचा कठोर शब्दांत निषेध केला होता. ब्रिक्स परिषदेत मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांसह तालिबान, इसिस आणि अल कायदा यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची मागणी ब्रिक्स देशांनी केली. हक्कानी नेटवर्क, तसेच शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर अंकुश आणला जावा, अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करणे, अतिरेक्यांकडून इंटरनेट, सोशल मीडियाच्या होणाºया वापरावर प्रतिबंध आणणे, यांचाही घोषणापत्रात समावेश आहे.
दहशतवादाच्या मुद्यावर चीनने पुन्हा दिला पाकिस्तानला पाठिंबा, दहशतवादविरोधी अभियानासाठी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 7:33 PM