चीनमध्ये आणखी एका व्हायरसने कहर सुरू केला. येथे H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील एका 56 वर्षीय महिलेला H3N8 बर्ड फ्लूची लागण झाली आणि सोमवारी तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, H3N8 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे.
गेल्या वर्षी, माणसांमध्ये या संसर्गाची आणखी दोन प्रकरणे नोंदवली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गंभीर निमोनियामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याला मायलोमा (कॅन्सर) सह अनेक आरोग्यविषयक समस्या होत्या. WHO ने अपडेटमध्ये म्हटले आहे की, 'सिव्हियर एक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन (SARI) प्रणालीद्वारे केस शोधण्यात आले. रुग्णाच्या जवळच्या संपर्कांपैकी कोणालाही संसर्ग किंवा रोगाची लक्षणे आढळली नाहीत.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, आजारी पडण्यापूर्वी ही महिला प्राण्यांच्या संपर्कात आली होती. एका बाजारात गेली होती. त्या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यात H3 एवियन इन्फ्लूएंझा व्हायरस आढळून आला, तर त्याच्या घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले आहेत. H3N8 फ्लूचा व्हायरस सामान्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो, परंतु तो घोड्यांमध्येही आढळतो आणि डॉग फ्लू होण्यास सक्षम असलेल्या दोन व्हायरस पैकी एक आहे.
चीनमध्ये नोंदवलेले नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचे फक्त तिसरे प्रकरण आहे आणि प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण आहे. या व्हायरसमुळे पहिल्यांदाच एखाद्याचा मृत्यू झाला आहे. 2022 मध्ये, प्रथमच माणसांमध्ये H3N8 व्हायरस पसरल्याची पुष्टी झाली. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"