बीजिंग : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार वेगाने होताना दिसत असून, आता चीनमध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले असून, कोरोनाचा जनक मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये नव्या स्ट्रेनचा प्रसार होणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
ब्रिटनमधून कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये खळबळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जगभरात विविध लसींना मान्यता द्यायला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.
दरम्यान, चीनकडून सिनोफार्मा कंपनीने विकसित केलेल्या लसीला सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. चीनमध्ये मान्यता देण्यात आलेली ही पहिलीच लस असून, या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही लस कोरोनावर ७९.३४ टक्के प्रभावी असल्याचा दावा सिनोफार्माकडून करण्यात येत आहे. चीनमध्ये सामान्यपणे लसीकरण सुरू होण्यापूर्वी १० लाख चिनी नागरिकांना सिनोफार्माची लस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चीनमध्ये आतापर्यंत चार लसींना मान्यता देण्यात आल्याचे समजते.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा फैलाव १६ हून अधिक देशांमध्ये झाला आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर या देशांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.