सिंगापूर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगत त्यांचा दावा फेटाळून लावला. सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)च्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (आएसएस)मध्ये अरुणाचल प्रदेश मुद्द्यावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘हा काही नवीन मुद्दा नाही. म्हणजे चीनने दावा केला आहे, त्याने आपला दावा वाढवला आहे. दावा सुरुवातीस हास्यास्पद होता आणि आजही हास्यास्पद आहे,’ परराष्ट्रमंत्री जयशंकर, जे येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत, बोलताना त्यांनी अरुणाचल प्रदेश हा भारताचा नैसर्गिक भाग आहे यावर भर दिला.
नेताजी बोस व आझाद हिंद सेनेला अभिवादन करत सिंगापूर दौऱ्याची सुरुवात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सिंगापूर येथील युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याची सुरुवात केली. एक्सवर पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले की, ‘नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. त्यांची प्रखर देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’
‘द्विपक्षीय संबंध वाढवण्याची संधी’ जयशंकर भेटीदरम्यान सिंगापूरच्या पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतील. सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, ‘जयशंकर यांची भेट सिंगापूर आणि भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला अधोरेखित करते. दोन्ही बाजूंना प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करण्याची, तसेच द्विपक्षीय सहकार्यातील चांगल्या प्रगतीवर चर्चा सुरू ठेवण्याची या भेटीमुळे एक चांगली संधी आहे.’