‘चीनचा माल म्हणजे बनावट’ हे आपल्याकडे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे स्वस्तात मिळत असल्या तरी चिनी वस्तू खरेदी करताना भारतीय अनेकदा विचार करतात. हाच प्रत्यय नव्याने येऊ लागला असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे चीनच्या लसीही बनावट असल्याची शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण चीनने तयार केलेली लस घेतल्यानंतरही कोरोना मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मलेशियामध्ये ७३ टक्के आहे. संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
नेमके काय आले समोर?
तीन कोटी लोकांचा देश असलेल्या मलेशियामध्ये १ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात कोरोनाने सात हजार ६३६ मृत्यू झाले आहेत. त्यातील २१५९ लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील ७३ टक्के लोक म्हणजे १५७३ लोकांनी चीनने तयार केलेली सिनोवॅक लस घेतली होती.
फायझरचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे हेच प्रमाण २५ टक्के तर ॲस्ट्राझेनेकाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मलेशियात ३६ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या काळात मलेशियामध्ये झालेल्या ७६३६ कोरोना मृत्यूंपैकी ४,०७६ लोकांनी कोणतीही लस घेतली नव्हती. १४०१ लोकांचा दुसरा डोस घेणे बाकी होते.
चीनच्या लसीमुळे वाढली अनेक देशांची चिंता
४३ देशांना ७६ कोटी सिनोवॅक लसीचा पुरवठा चीनने केला आहे. या सर्व देशांची चिंता आता वाढली असेल. ७६ देशांना चीनच्या सिनोफार्मा या कंपनीने कोट्यवधी डोस दान केले आहेत.
चीनच्या लसीनंतरही मृत्यू कशामुळे ?
मलेशियामध्ये २४ फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू झाले आणि सुरुवातीला मोठ्या प्रमाणात चीनची सिनोवॅक लस वापरण्यात आली.दोन्ही डोस पूर्ण होऊन अनेक जणांना काही महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी झाली असावी, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
भारतातील काय स्थिती
आयसीएमआरच्या माहितीनुसार भारतात दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ ०.४ टक्के आहे. ६७७ कोरोना रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.