ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 22 - पाकिस्ताननं चीनमधील नागरिकांसाठी व्हिसा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे संबंध प्रभावित होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चीनमधून आलेल्या दोन व्यक्तींनी ईसाई धर्माचा गुपचूप प्रचार केल्याच्या कारणास्तव क्वेटा येथून त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. तसेच या दोघांनी पाकिस्तानातील व्हिसा मानकांचं उल्लंघन केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळेच पाकिस्ताननं चिनी नागरिकांसाठी व्हिसा नियम कडक केल्याचा निर्णय इस्लामाबादचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिसा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, दोन्ही देशांमधील व्हिसा प्रक्रियेचा दुरुपयोगही टाळता येणार आहे. बीजिंगमधल्या पाकिस्तानातील दूतावासाला व्हिसा देण्यासाठी दिलेल्या दस्तावेजांचीही कडक पद्धतीनं छाननी करण्यात येणार आहे. पाकिस्तानात येत असलेल्या चिनी नागरिकांद्वारे व्हिसा नियमांचं उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. आता चिनी नागरिकांना व्हिसा मान्यताप्राप्त चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीद्वारे प्रमाणित केल्यानंतरच देण्यात येणार आहे. इस्लामाबादचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत फक्त वर्क व्हिसाची मुदत वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे. पाकिस्तानात गेल्या महिन्यात दोन चिनी नागरिकांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यात आलेले दोघेही धार्मिक उपदेशक असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यांनी पाकिस्तानातील व्हिसा मानकांचं उल्लंघन केलं होतं. पहिल्यांदा ते पेशानं शिक्षण असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांची ओळख धार्मिक उपदेशक असल्याची झाली आहे. पाकिस्तानातील गृहमंत्रालयानं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख जिंग यांग(24) आणि मेंग ली सी(26) अशी केली होती.
पाकनं चिनी नागरिकांसाठी केले व्हिसा नियम कडक
By admin | Published: June 22, 2017 6:15 PM