कर्जाच्या संकटात अडकलेला पाकिस्तान पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला आहे. अशा परिस्थितीत चीन आणि सौदी अरेबियाचाही पाकिस्तानला धक्का बसला आहे. दोन्ही देशांनी आता पाकिस्तानमधील गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये आर्थिक मंदी सुरु आहे. त्यामुळे येथे महिनाभरापासून बंडखोरी सुरू आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती पाहून परदेशी गुंतवणूकदारांनीही आपले दरवाजे बंद केले. आता पाकिस्तानचे मित्र सौदी अरेबिया, यूएई आणि चीननेही निधी थांबवला आहे. चीन आणि सौदीने १.८२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक थांबवली आहे. याबाबत गेल्या वर्षीच चीनने पाकिस्तानमध्ये १.४२ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची चर्चा केली होती, मात्र आता चीनने नकार दिला आहे.
यामागचे कारण पाकिस्तानमध्ये सुरक्षा नसणे असल्याचे सांगितले जात आहे. चीनचे अनेक प्रकल्प पाकिस्तानात सुरू आहेत. चिनी अभियंत्यांवरही दहशतवादी हल्ले होत आहेत, पण पाकिस्तान त्यांना सुरक्षा देऊ शकत नाही. याचबरोबर, पाकिस्तानचे सौदी अरेबियासोबतचे संबंधही बिघडत आहेत. शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची पहिली भेट सौदी अरेबियाला होती.
सौदीने आधी २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले होते, परंतु नंतर ते ४० हजार कोटींवर आले. आता ही गुंतवणूकही थांबली आहे. गुंतवणुकीबाबत चीनने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि अर्थमंत्री औरंगजेब यांना महत्त्व दिलेले नाही. चीन पाकिस्तानवर प्रचंड नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानची अमेरिकेशी वाढती जवळीक हे, यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. याशिवाय, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे चीनची चिंताही वाढली आहे. येथे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये पैसे गुंतवण्यास चीन टाळाटाळ करत आहे.
युएईनेही घेतली माघारचीन आणि सौदी अरेबियानंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) नेही पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. यूएईने पाकिस्तानमध्ये ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. पंरतू, यूएईने माघार घेतली असून ही गुंतवणूक करण्यात आली नाही. दुसरीकडे, सौदी अरेबिया आता भारतात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदी भारतात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.