बीजिंग - अंतराळात भरकटत असलेले चीनचे स्पेस स्टेशन अखेर पॅसिफिक महासागरात कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. संपर्क तुटल्यानंतर गेली दोन वर्ष अंतराळात भरकट असलेले चीनचे स्पेस स्टेशन सोमवारी (2 एप्रिल) पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यादरम्यान मुंबई किंवा महाराष्ट्रात हे स्पेस स्टेशन कोसळेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. हे स्पेस स्टेशन हे यान उत्तर व दक्षिण अमेरिका, चीन, मध्य पूर्व, आफ्रिका,ऑस्ट्रेलिया, युरोपचा काही भाग, पॅसिफिक व अॅटलांटिक महासागर परिसरात या कोसळू शकते, असेही म्हटले गेले होते.
मात्र, हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळल्यानं सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे. अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे स्पेस स्टेशन जळून खाक झालं व त्याचे तुकडे पॅसिफिक महासागरात पडल्याची माहिती समोर आली. टीयाँगाँग-1 असं या स्पेस स्टेशनचं नाव असून ते बसच्या आकाराचे होते. मार्च 2016 मध्ये या स्पेस स्टेशनचा चीनशी असलेला संपर्क खंडित झाला होता. तेव्हापासून ते स्पेस स्टेशन अंतराळात फिरत होते.
दरम्यान, हे स्पेस स्टेशन भारतात कोसळणार नाही, याबद्दलची भीती इस्त्रोनं दूर केली होती. तर या घटनेमुळे पृथ्वीवरील कोणालाही आणि हवाई वाहतुकीला फटका बसणार नाही, असे चायना मॅनड् स्पेश इंजिनिअरिंग ऑफिसनं वृत्तसंस्थेला सांगितले होते.