चीनने दोन वर्षांनी पुन्हा एकदा अवघ्या जगाच्या चिंता वाढविल्या आहेत. कोरोनाला जन्म देऊन महापाप केलेले असताना आता तोच कोरोना चीनमध्ये बुमरँग सारखा उलटला आहे. चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे जगाच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.
चीनमध्ये साधारण सव्वादोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. यावर चीनने अत्यंत गुप्तता बाळगली, परंतू नंतर हा कोरोना जगभरा पसरू लागला. चीनने आपल्या देशातील कोरोना दाबून टाकण्यासाठी कठोर लॉकडाऊन लावला होता. आजही लावला आहे. १०० टक्के लोकांचा लसीकरण झालेले आहे. असे असले तरी शांघायमध्ये कोरोना थांबण्याचे नाव घेत नाहीय. रस्त्यावर एकही गाडी दिसत नाहीय. अशावेळी चीनच्या समुद्रात मात्र, हजारो जहाजे अडकली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शांघायमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. या महिनाभरापासूनच्या लॉकडाऊनचा गंभीर परिणाम शांघायच्या बंदरावरही झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर मालवाहू जहाजे उभी असल्याने चीनच्या समुद्रात अघोषित ट्रॅफिक जाम झाले आहे.
या ट्रॅफिक जामचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामध्ये शांघाय बंदराच्या परिसरात जहाजांची संख्या दिसत आहे. अनेक जहाजांमध्ये माल चढवायचा आहे, तर अनेकांमधून उतरवायचा आहे. परंतू काहीच सुरु नसल्याने या जहाजांवरील क्रू मेंबरही अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांकडील अन्नधान्य, गरजेच्या वस्तूही संपू लागल्या आहेत. साधारणपणे एका बंदरातून निघताना ही जहाजे गरजेच्या वस्तूंचा साठा सोबत ठेवतात, दुसऱ्या बंदरात गेल्यावर तो पुन्हा भरला जातो. परंतू इथे शांघायच बंद असल्याने या लोकांना काहीच मिळू शकलेले नाहीय.
याचबरोबर या जहाजांना बंदर सोडून जाण्याची परवानगीही मिळत नाहीय. चीनमध्ये नव्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाहीय. कमी लक्षणे असली तरी रुग्णांना भरती केले जात होते. यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच सुएझ कालव्यामध्ये एव्हरग्रीन मालवाहू जहाज अडकले होते. यामुळे कित्येक दिवस या कालव्यातील वाहतूक बंद होती आणि अनेक जहाजे अडकली होती.