विजय बाविस्कर, थेट तैवान येथून लोकमत न्यूज नेटवर्क, तैपेई : जगभरातील अनेक देशांनी चीनमध्ये गुंतवणूक केली व त्याला व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे त्या देशाचे सामर्थ्य वाढले. तैवानसह जगातील शांतता, सुरक्षा, समृद्धीसाठी चीन आता आपले योगदान देईल अशी सर्व देशांना आशा आहे, असे तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांनी म्हटले आहे.
तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त १० ऑक्टोबर रोजी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांनी केलेल्या भाषणात म्हटले आहे की, सध्या आंतरराष्ट्रीय तणाव वाढत आहे. संघर्षात दररोज असंख्य निष्पाप लोक जीव गमावत आहेत. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि मध्य पूर्वेतील संघर्ष संपविण्यासाठी चीन इतर देशांसोबत काम करेल अशी सर्वांना आशा आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा तैवानवर कोणताही हक्क नाही. तैवानमधील २.३ कोटी लोकांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. तैवान व चीनमध्ये मतभिन्नता आहे. अशी स्थिती असूनही आम्ही चीनसोबत सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, आमचे सार्वभौमत्व कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार करण्याचीही तयारीही तैवानने ठेवली आहे.
राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते म्हणाले की, तैवानची जनता व तिच्या मालमत्तेचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करणे, लोकशाही देशांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असणे या गोष्टी तैवान प्राधान्याने करत आहे. आमच्या भावी पिढ्यांनी शांततामय जीवन जगावे अशी इच्छा आहे. त्यासाठी माझे सरकार योग्य पावले उचलत आहे. तैवानची अर्थव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच त्यामुळे होणाऱ्या विकासाची फळे सर्व नागरिकांना मिळायला हवीत, यावरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
हे मान्यवर राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला होते उपस्थित
तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त गुरुवारी आयोजिलेल्या समारंभप्रसंगी तुवालूचे पंतप्रधान फेलेटी टिओ आणि त्यांची पत्नी, बेलीझचे उपपंतप्रधान कॉर्डेल हाइड आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे उपपंतप्रधान माँटगोमेरी डॅनियल हे अतिथी म्हणून उपस्थित होते. सेंट लुसिया सिनेटच्या अध्यक्ष अल्विना रेनॉल्ड्स आणि हाऊस स्पीकर क्लॉडियस जे. फ्रान्सिस, ग्वाटेमालाच्या फर्स्ट लेडी लुक्रेसिया पेनाडो आणि पलाऊचे राज्यमंत्री गुस्ताव ऐतारो, तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष सिओ बी-खिम, त्या देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग, एक्झिक्युटिव्ह युआन प्रेसिडेंट/ प्रिमिअर चो जुंग-ताई हे मान्यवर देखील सदर कार्यक्रमाला हजर होते.
‘जगाला शाश्वत विकास साधायचा आहे’
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांनी सांगितले की, तैवानसह जगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलासारख्या संकटाला सामोरे जात जगाला शाश्वत विकास साधायचा आहे. हुकूमशाहीवृत्ती व विस्तारवाद यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियमांनाच आव्हान देण्याची प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. या सर्व गोष्टींमुळे लोकशाही जीवनपद्धतीला धोका निर्माण होत असून, तो टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.