बीजिंग-
जगभरातील टीका झुगारून चीनने दक्षिण प्रशांत महासागरात लष्करी वर्चस्व वाढवले आहे. पॅसिफिक महासागरातील सॉलोमन्स या छोट्या बेटाशी चीनने वादग्रस्त सुरक्षा करार केला आहे. चीनचे सैन्य आता ऑस्ट्रेलिया सीमेपासून केवळ २ हजार किमीपर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीन आता सोलोमन बेटांवर लष्करी तळ उभारू शकतो, अशी भीती ऑस्ट्रेलिया आणि पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे.
चीनने याआधी आफ्रिकेतील जिबूती येथे लष्करी तळ उभारून जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. "दोन्ही देशांनी एक करार केला आहे. याआधी, एक अमेरिकन टीम सोलोमन बेटांवर पोहोचली होती. जेणेकरुन आमचं समर्थन करणाऱ्या सोलोमन सरकारला इशारा देता येईल. या कराराचा उद्देश सोलोमन बेटांवर सामाजिक स्थिरता आणि दीर्घकालीन शांतता तसेच सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे आहे", असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
चीनचा हा करार केवळ सोलोमन बेटे आणि दक्षिण पॅसिफिकच्या समान हिताच्या दिशेने असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने या कराराच्या अटींचा खुलासा केलेला नाही, परंतु सोलोमन बेटांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार या करारावर ३१ मार्च रोजी स्वाक्षरी करण्यात आली असून त्याला नंतर मान्यता दिली जाईल. चीन प्रशांत महासागरात लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला आहे. या दोन्ही देशांनी सोलोमन बेटांचे पंतप्रधान मनसेह सोगवारे यांच्याकडे करार रद्द करण्याची विनंती केली होती.
सोलोमन आयलंडचे पंतप्रधान मनसेह सोगवारे यांनी त्यांचे पालन करण्याऐवजी अमेरिकेच्या सूचना 'अपमानजनक' असल्याचे म्हटले आहे. हा करार सार्वजनिक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असल्याचा दावा चीनने केला आहे. हे कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करून केले गेलेले नाही. त्याचवेळी, यामुळे चीनला प्रशांत महासागरात आक्रमकता दाखवण्याचा मार्ग मोकळा होईल, असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे मत आहे.
चीनचा हा करार प्रदेश अस्थिर करेल. सुरक्षा कराराचा तपशीलवार मसुदा सोलोमन बेट सरकारच्या आश्वासनाला न जुमानता चीनच्या सैन्याच्या तैनातीसाठी दार उघडणारा ठरणार आहे, असे यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले. चीनचा डाव हाणून पाडण्यासाठी अमेरिकेने २९ वर्षांनंतर आपला दूतावास पुन्हा सुरू केला आहे. अमेरिकेच्या या खेळीमुळे चीनलाही मिरची झोंबली आहे.