बीजिंग: चीनने तब्बल ६०० किमी प्रतितास वेगाने धावणारी मॅग्लेव ट्रेन सुरू केली आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. चीनमधील किंगदाओमध्ये या ट्रेनची निर्मिती झाली आहे.
इलेक्ट्रो-मॅगनिक फोर्स म्हणजेच विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून ही ट्रेन धावते. मॅग्लेव ट्रेन ही रेल्वे रूळांवर न धावता हवेत धावते. त्यामुळे कमी प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जातो आणि ट्रेन वेगाने धावते.
चीन मागील दोन दशकांपासून फारच कमी प्रमाणात, मर्यादित स्वरुपात या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. शांघाईमध्ये एक कमी अंतराचा मॅग्लेव मार्ग आहे. विमानतळ ते शहरादरम्यान हा मार्ग आहे. चीनमध्ये आतापर्यंत इंटरसिटी मॅग्लेव मार्ग नाही. शांघाई, चेंगदूसह काही शहरांमध्ये या मॅग्लेव मार्गाबाबत पाहणी सुरू करण्यात आली आहे.
६०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला बीजिंगपासून शांघाईपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त २.५ तास लागतात. या दोन्ही शहरातील अंतर १००० किमी आहे. विमानाने प्रवास केल्यास हे अंतर कापण्यास तीन तास लागतात आणि हाय स्पीड ट्रेनने प्रवास केल्यास ५.५ तास लागतात.
दरम्यान, जपान, जर्मनी आदी देश सुद्धआ मॅग्लेव रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्यात अडथळे निर्माण होत आहेत.