China-Taiwan Conflict : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव नवीन नाही. परंतु अलीकडच्या काळात हा तणाव पुन्हा वाढला आहे. चीननं तैवानजवळ लष्करी सराव सुरू केला आहे. यात युद्धनौका आणि लढाऊ विमानांचा समावेश आहे. या युद्ध सरावाला "ज्वाइंट स्वॉर्ड-२०२४ बी" असं नाव देण्यात आलं आहे.
या सरावाचा उद्देश तैवानवर दबाव आणणं आणि आपली लष्करी ताकद दाखवणं, असा असल्याचं म्हटलं जात आहे. चीन या सरावाला आपल्या संयुक्त ऑपरेशन क्षमतेची चाचणी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तैवानला धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्य समर्थक विचारांना दडपण्याचा प्रयत्न म्हणून याकडं पाहिलं जात आहे. तैवानचे राष्ट्रपती विलियम लाई चिंग ते यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणानंतर चीनचा संताप वाढला आहे.
तैवान आणि चीन वेगळे आहेत. चीनला तैवानचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही, असं विलियम लाई चिंग ते यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळं त्यांचं हे विधान तैवानला आपला भाग मानणाऱ्या चीनला आव्हान देण्यासारखं होतं. यानंतर प्रत्युत्तर म्हणून, चीननं लगेचच आपली पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) सक्रिय केली आणि तैवानभोवती नाकेबंदीसारखं वातावरण निर्माण केलं आहे.
चीनकडून आयोजित करण्यात आलेल्या "ज्वाइंट स्वॉर्ड-२०२४ बी" लष्करी सरावात २५ लढाऊ विमाने, ७ नौदल जहाजे आणि इतर चार जहाजे तैवानच्या आसपास दिसली आहेत. यातील काही विमाने तैवानची मध्यवर्ती रेषा ओलांडून तैवानच्या नैऋत्य भागात घुसली. चीनचे हे लष्करी प्रदर्शन म्हणजे तैवानला धमकावण्याचा आणखी एक प्रयत्न आहे, कारण तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो आणि चीनचे कोणतेही दावे फेटाळून लावतो.
तैवानला अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांचा पाठिंबातैवानला अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दिल्यामुळं चीन अधिक आक्रमक झाला आहे. तैवानबाबत चीनच्या आक्रमक धोरणाचे "ज्वाइंट स्वॉर्ड-२०२४ बी" हे एक उदाहरण आहे. त्यामुळं या भागातील स्थिरता आणि शांतता धोक्यात आली आहे. चीनचा दबाव असूनही, तैवान आपल्या स्वातंत्र्यावर आणि राष्ट्रीय अस्मितेवर स्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय समर्थनामुळे तैवानची स्थिती मजबूत आहे.