बीजिंग : आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करत आहे. सायबरमार्गे तंत्रज्ञानाची चोरी करून किंवा गोपनीय माहितीसाठी चिनी नागरिकांना दुसऱ्या देशांत विशेषत: अमेरिका व युरोपात हेरगिरीस भाग पाडून शक्तिशाली बनण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा पॉलिसी रिसर्च ग्रुपने केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोणत्याही मार्गाने आपल्या देशाला प्रबळ करण्याचे ठरविले आहे. अमेरिका, युरोपातील काही देश वगळता चीन रशियापासून इतर देशांच्या लष्करी तंत्रज्ञानाची सायबर वा अन्य मार्गाने सर्रास चोरी करतो. गरीब देशांमधील विकास प्रकल्पांत चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. जे देश चीनची कर्जे फेडू शकत नाहीत, त्यांची अवस्था केविलवाणी होते. त्यांना चीनच्या मागण्यांपुढे मान तुकवावी लागते. (वृत्तसंस्था)
अमेरिका चीनपेक्षाही सरसपॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे की, अमेरिकेची गुपिते जाणून घेण्यासाठी चीनचा सर्वाधिक आटापिटा चाललेला असतो. त्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. मात्र, अमेरिकेकडे चीनपेक्षाही प्रगत तंत्रज्ञान असल्यामुळे चीनचे चोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात येतात. अमेरिकेच्या पेंटॅगॉनच्या अहवालातही चीन करत असलेल्या चोऱ्या व हेरगिरीबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्याचा हवाला पॉलिसी रिसर्च ग्रुपने दिला आहे.
हेरगिरी करणाऱ्या चिनी लोकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड - अमेरिकेमध्ये चिनी नागरिक मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. त्यातील अनेकजण शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अमेरिकेत जातात, पण त्यातील काही चीनसाठी अमेरिकेत हेरगिरी करतात. - अशा चार चिनी नागरिकांना अमेरिकी तपास यंत्रणांनी २४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यातले तीनजण चीनच्या सुरक्षा विभागातील अधिकारी असल्याचे तपासात आढळून आले. - २०२१मध्ये अमेरिकेने हेरगिरीच्या आरोपावरून सहा चिनी अध्यापकांना अटक केली. २०२० साली अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या काही चिनी विद्यार्थ्यांना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यातील एकजण चिनी लष्करातील अधिकारी होता व तो विद्यार्थी बनून अमेरिकेत आला होता. विमान बनविण्यासाठी केली कॉपीचीनचे जे-२० हे विमान अमेरिकेच्या एफ-२२ व जे-३१ विमान एफ-३५ विमानासारखेच असल्याचा आरोप झाला होता. चीनने हे दावे फेटाळून लावले आहेत. मात्र, विमान निर्मितीसाठी चीनने अमेरिकी तंत्रज्ञानाची कॉपी केली आहे हे काही जगापासून लपून राहिलेले नाही, असेही पॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे.