China-Taiwan Tension: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच गुरुवारी चीनने एक पाऊल पुढे जात तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. तैवान सरकारने याला दुजोरा दिला आहे. ही क्षेपणास्त्रे तैवानच्या आजूबाजूच्या भागात पडली. पण यापैकी काही क्षेपणास्त्रांचे लँडिंग जपानमध्ये झाल्याचे बोलले जात आहे.
जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी 5 क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडली आहेत. ही देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाब आहे, जापानी नागरिकांच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करणार नाही. दरम्यान, यापूर्वी(बुधवारी) तैवानच्या हवाई क्षेत्रात 27 चीनी लढाऊ विमाने दिसून आली आहेत. या कारवाईमुळे तैवाननेही आपली क्षेपणास्त्र यंत्रणा अॅक्टिव्ह केली आहे. लष्करी सरावाच्या नावाखाली चीन तैवानला सतत इशारे देत असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेचा हस्तक्षेपया दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या तणावाची स्क्रिप्ट अमेरिकेने लिहिली आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यापासून चीनकडून धमक्या सुरू झाल्या आहेत. नॅन्सी पेलोसी अमेरिकेला परत गेल्या, पण त्यांच्या फक्त एका दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील वाद वाढला आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, चीनचे सैन्य 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान 6 वेगवेगळ्या भागात लष्करी सराव करणार असून, त्यांनी तैवान बेटाला चारही दिशांनी वेढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन देशांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.