बीजिंग - चीन सैन्याकडून तैवानला समुद्राच्या चारही दिशेनं घेरलं आहे. तैवानला घाबरवण्यासाठी चीन सैन्याकडून युद्धसराव केला जात आहे. त्यात १५३ हून अधिक फायटर विमाने उडवण्यात आली. चीन लष्कराने फायटर जेट, ड्रोन, युद्धनौका आणि कोस्ट गार्डच्या नौकांच्या मदतीने युद्ध सराव केला अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. तैवानने चीनच्या या कृतीचा तीव्र निषेध केला असून हे विनाकारण चिथावणी देणारे कृत्य असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या कोणत्याही गैरप्रकाराला तोंड देण्यासाठी जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही तैनात करत तैवानने आपल्या सैन्याला सतर्क केले.
तैवानने सांगितले की, २५ तासांत तैवानभोवती १५३ लढाऊ विमाने पाहण्यात आली. यापैकी १११ लढाऊ विमानांनी मेडिअन सीमा ओलांडली. चीन या सीमारेषेला मानत नाही. चीनने युद्धासाठी तयार असल्याची शपथ घेतली आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो. अनेक चिनी युद्धनौका आणि विमानवाहू युद्धनौकाही तैवानच्या आसपास आहेत. चीनच्या या हालचालीमुळे तैवानच्या जलडमरुमध्य इथं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तैवानचे राष्ट्रपती लाइ चिंग-ते यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत तैवानने स्वत:ला चीनचा भाग म्हणून स्वीकारावे या बीजिंगच्या मागणीला मान्यता देण्यास नकार दिल्याने हा अभ्यास आहे असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
चीनच्या धमकीवर तैवान काय म्हणाले?
या सरावांच्या चार दिवस आधी तैवानने आपल्या सरकारची स्थापना दिवस साजरा केला. ज्यामध्ये तैवानचे राष्ट्रपती म्हणाले की चीनला तैवानचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही आणि बेकायदेशीर कब्जा किंवा अतिक्रमणाचा प्रतिकार करण्याची' शपथ घेतली तर आमचे सैन्य निश्चितपणे चीनच्या आव्हानाला योग्य प्रकारे सामोरे जाईल. बळाचा वापर करून इतर देशांना धमकावणे हे विवाद शांततेने सोडवण्यासाठी UN चार्टरच्या मूळ भावनेचे उल्लंघन करते असं तैवानच्या सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस जोसेफ ताइपे यांनी सांगितले.
दरम्यान, तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयाने चीनला प्रादेशिक शांतता आणि स्थिरता बिघडवणारी लष्करी चिथावणी थांबवावी आणि तैवानच्या लोकशाही आणि स्वातंत्र्याला आव्हान देणे थांबवावे असा इशारा दिला आहे. चीनं युद्धसरावावेळी विमानवाहू नौका देखील तैनात केले आहे. राज्य प्रसारक सीसीटीव्हीने J-15 लढाऊ विमान जहाजातून उड्डाण घेतल्याचं कैद केले आहे.