India vs China in Bhutan: भारत आणि चीनमधील २०१७ मध्ये डोकलाम वादाच्या वेळी, पश्चिम भूतानजवळील सिलीगुडी कॉरिडॉर हे एक महत्त्वाचे धोरणात्मक स्थान म्हणून उदयास आले होते. चीनने अनेक दशकांपासून यावर लक्ष ठेवले होते. त्याच वेळी, गेल्या ५ वर्षांपासून चीन भूतानच्या उत्तरेकडील भागावरही लक्ष ठेवून आहे. भूतानच्या उत्तरेकडील भागांजवळ चीन वेगवान पद्धतीने पायाभूत सुविधा विकसित करत आहे, जे भारतासाठी चिंतेचे प्रमुख कारण आहे, असे सॅटेलाइट प्रतिमांनी उघड केले आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा का?
भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. कारण आगामी काळात जकारलुंग व्हॅली चीनच्या ताब्यात जाऊ शकते. भूतानच्या संमतीनंतर चीनने जकारलुंग आणि शेजारील मेनचुमा खोरे दोन्ही जवळपास ताब्यात घेतले आहेत आणि भूतान ही जमीन चीनला देईल हे देखील निश्चित आहे.
भूतानवर चीनचा वाढता ताबा
चीनने भूतानच्या अनेक भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. भूतानच्या बेयुल खोऱ्यात चीनने रस्त्यांचे जाळे विणले आहे. त्यांनी त्यांच्या सैन्यासाठी लष्करी चौक्याही बांधल्या आहेत. चीनने यापूर्वीही भूतानच्या भागात रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी हे केवळ पश्चिम भूतानपुरते मर्यादित होते. २०१७ मध्ये चीनने दक्षिण-पश्चिम डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला, त्याला भारताने विरोध केला. त्यावेळी PLA ची भारतीय जवानांशी चकमक झाली होती. त्यातच आता चीनचा भूतानवर वाढणारा ताबा पाहता भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे ही निश्चित आहे.