वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकी लष्कराने चीनचा बलून (मोठा फुगा) अखेर अटलांटिक महासागरात पाडला. हा बलून हेरगिरीसाठी सोडण्यात आल्याचा संशय होता. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तो नष्ट करण्याचे आदेश लष्कराला दिले होते. अमेरिकेच्या या कारवाईवर चीनने रविवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. आपल्या मानवरहित एअरशिपवर बळाचा वापर करण्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, अशी धमकी चीनने दिली.
- अमेरिकेच्या हद्दीत आलेला हेरगिरी बलून तीन बसइतका मोठा होता.
- एफ-२२ लढाऊ विमानातून सोडलेल्या क्षेपणास्त्राने बलूनला टिपले.
- बलून अमेरिकेच्या हवाई हद्दीत अटलांटिक महासागरात कोसळला.
बुधवारी मला या बलूनची माहिती देण्यात आली. त्यानंतर मी पेंटॅगॉनला लवकरात लवकर तो पाडण्याचे आदेश दिले. जमिनीवर कोणालाही इजा न होऊ देता हा बलून पाडायचे ठरले. त्यामुळे हा बलून पाडण्यासाठी तो समुद्रावर उडत असल्याची वेळ सर्वांत योग्य होती. - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका.
बळाचा वापर अवाजवी; चीनची टीका - मानवरहित एअरशिपवर अमेरिकेकडून झालेल्या बळाच्या वापराबाबत आपण तीव्र नाराजी व्यक्त करतो, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. - उभय देशांतील राजकीय संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे.