बीजिंग : भारत व चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये भूतानला मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. एवढेच नव्हे, तर भूतानमध्येही ढवळाढवळ करण्याची चीनची योजना आहे. भूतानमधील लोक समाधानी नाहीत, असे म्हणत चीनने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे.भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तेथील नागरिक आनंदी वा समाधानी नाहीत, असे चीन सरकारच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे. एकीकडे सिक्कीममध्ये, दुसरीकडे भूतानमध्ये ढवळाढवळ करण्याचे चीनचे प्रयत्न यातून उघड होत आहेत. भूतानने १ लाख नेपाळींना आपल्या देशातून हाकलून लावले होते आणि ते करण्यात भारताचा हात होता आणि १९७५ साली सिक्कीमही भारताने बळकावलेच होते. ते करण्यासाठी भारतीय लष्कराने तेथे जनतेच्या नावाने राजाविरुद्ध तथाकथित बंड घडवून आणले, असाही आरोप चीनने केला आहे. (वृत्तसंस्था)मोदी-जिनपिंग भेट रद्ददोन देशांतील तणाव वाढत चालल्यामुळे जर्मनीतील हॅमबर्ग येथे होणाऱ्या जी२0 परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्याचे वातावरण योग्य नाही, असे सांगून चीनने दोन नेत्यांची जर्मनीमध्ये भेट होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दोन नेत्यांच्या भेटीतून वाद संपविण्यासंदर्भात काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत, असे सांगून चीनने ती शक्यता फेटाळून लावली आहे. चीनचा युद्धसरावचिनी लष्कराने तिबेटच्या पर्वतराजीत ५,१०० मीटर उंचीवर रणागाड्यांसह नवीन शस्त्रास्त्र उपकरणांची चाचणी घेतली, असे वृत्त चीनच्या सरकारी ‘झिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. नवी शस्त्रास्त्र उपकरणांसह चिनी फौजांनी गोळीबार करीत युद्धाचा सरावही केला. सिक्कीममधील जनतेची स्वतंत्र होण्यासाठीची आंदोलने भारताने चिरडली, असा हास्यास्पद दावा चीनने केला आहे. एवढे सारे आरोप करणाऱ्या चीनने भारताला मात्र तिबेट व दलाई लामा यांचा विषय उकरून काढू नये, असा शहाजोग सल्ला दिला आहे. संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे भारताने ठरविले, तर ते भारताला महागात पडेल, अशीही धमकी चीनने दिली आहे.
चीनच्या धमक्या आणखी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2017 5:15 AM