चीनमधील एका शहरात लॉकडाऊन लावण्याच्या सल्ल्यानंतर लोक भडकले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला. इन्फ्लूएंझाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, चीनमधील शानक्सी प्रांतात असलेल्या शिआन शहरातील अधिकाऱ्यांनी एका इमरजन्सी रिअॅक्शन प्लॅनची घोषणा केली होती. यात फ्लूची स्थिती गंभीर झाल्यास, बाजारपेठा, शाळा आणि इतर गर्दीची ठिकाणं बंद करण्यास सांगण्यात आले होते. या इमर्जन्सी रिअॅक्शन प्लॅनमध्ये चार स्टेप्स आहेत, यात शेवटचा स्टेप लॉकडाऊनची आहे.
लॉकडाऊनच्या शक्यतेने युजर्स संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर या योजनेला जबरदस्त विरोध केला. ही योजना कोरोना काळात देशात तीन वर्षे सुरू असलेल्या झिरो-कोविड योजनेप्रमाणेच आहे, असे युजर्सचे म्हणणे आहे. खरे तर, कोरोना संदर्भातील कठोर धोरणामुळे चीनला संपूर्ण जगभरातून टीकेचा सामना करावा लागला आहे.
कोविड काळात शियानमध्ये कडक लॉकडाऊन -सीएनएनच्या एका वृत्तानुसार, कोरोनामुळे कडक प्रतिबंध लादण्यात आले होते. यामुळे डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2022 दरम्यान शियान शहरातील 30 लाख लोक काही आठवडे आपल्या घरातच बंद होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, चीनमध्ये फ्लू रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे औषधांच्या दुकानांवरही औषधाची कमतरता जाणवत आहे.